मुंबई - डीएनए चाचणी विना रखडलेल्या दत्तक विधानांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारने डीएनए चाचणी अहवाल तात्काळ आणि जलदगतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दत्तक बालकांना लवकरच हक्काचे घर मिळेल, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिली.
राज्यात दांपत्याअभावी शेकडो दत्तक बालकांचा प्रश्न चिंतेची बाब बनली होती. त्यात डीएनए चाचणीचा अहवाल नसल्याने अनेक बालकांचा नव्या कुटुंबामध्ये प्रवेश रखडला होता. हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी बुधवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला आणि बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली.
डीएनए चाचणीवर विशेष चर्चा
या बैठकीत बालकांच्या डीएनए चाचणीवर विशेष चर्चा करण्यात आली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेने डीएनए चाचणी करून द्यावी, अशी आग्रही मागणी मंत्री ठाकूर यांनी केली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ही बाब समजून घेत न्यायवैद्यक चाचणी अहवाल प्राधान्याने करून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.