महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली सह्याद्री अतिथीगृहात गोपनीय बैठक - गृहमंत्री अनिल देशमुख गोपनीय बैठक न्यूज

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख वादात सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. सोमवारी रात्री अनिल देशमुखांनी शासकीय अतिथीगृह असलेल्या सह्याद्रीवर एक गुप्त बैठक घेतली आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

By

Published : Mar 23, 2021, 7:36 AM IST

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर दोन दिवसांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या शासकीय निवसास्थानातून बाहेर पडले. सोमवारी रात्री 8 वाजता ते सह्याद्री अतिथीगृहावर गेले. तिथे त्यांनी रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. मात्र, ही बैठक कोणासोबत होती याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. जवळपास तीन तास ते सह्याद्री अतिथीगृहात होते. सह्याद्री अतिथिगृहावर देशमुख यांच्या आधी कोण गेले होते, याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनी पहिल्यांदाच आपल्या शासकीय निवस्थानातून बाहेर पडत तीन तास बैठक घेतली आहे. त्यामुळे ही बैठक महत्वाची असणार हे नक्की आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेला 'वर्षा बंगला' आणि गृहमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'ज्ञानेश्वरी' हे शेजारीच आहेत. त्यामुळे जर गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची असती तर त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन चर्चा केली असतील. मात्र, गृहमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर येऊन बैठक घेतली. त्यांनी तीन तास कोणासोबत चर्चा केली याबद्दल आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

परमबीर सिंगांनी देशमुखांवर केले होते आरोप -

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. या पाठविलेल्या पत्रातून सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप सिंग यांनी पत्रातून केला आहे. मुंबईतील बारमधून दरमहा सुमारे 50 कोटी तर इतर माध्यमातून 50 कोटी अशा प्रकारे 100 कोटी वसुलीचे टार्गेट देशमुखांनी दिल्याचा आरोप आहे. या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

लेटर बॉम्बनंतर विरोधक आक्रमक

हे पत्र समोर आल्यानंतर मुख्य विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे आरोप अत्यंत गंभीर असून या प्रकरणी निष्पष्क्ष चौकशीची मागणी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपच्या इतर नेत्यांनीही देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याविरोधात रविवारी भाजपने राज्यभरात जोरदार निदर्शनेही केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -अँटिलिया प्रकरण : एनआयएकडून हॉटेल ट्रायडेंटमध्ये तपासणी

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details