मुंबई- महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे एक निवदेन समाज माध्यमांवर बुधवारपासून फिरत आहे. या निवेदनाच्या सत्यतेबद्दल साशंकता असून लोकांमधे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या निवेदनाबद्दल खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका निवेदनामार्फत केंद्र सरकारला प्रश्न विचारले आहेत. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमामध्ये काम करणाऱ्या काही मंडळींचा असा दावा आहे की, हे निवेदन हे गृहमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत त्यांना पाठवले गेले आहे. तर काही प्रसारमाध्यमे हे पत्र खोटे अथवा बनावट असल्याचा दावा करत आहेत.
प्रथमदर्शनी ते निवेदन हे खोटे असल्याचे भासते. त्यातील भाषा बघता ती सरकारी किंवा औपचारिक भाषा नसून अतिशय अनौपचारिक भाषा आहे. ते कोणा प्रति लिहीले आहे किंवा प्रेस रिलीज असल्यास 'प्रसिद्धीसाठी' असेही त्यात लिहिण्यात आले नसल्याने ते निवेदन यापैकी नेमके काय आहे, हे कळत नाही. त्यामुळे त्याबाबतचा संभ्रम अधिकच वाढत आहे. जर हे निवेदन खोटे असेल, तर हा एक गंभीर गुन्हा आहे आणि हा गुन्हा जर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीत घडत असेल, तर ती अधिकच गंभीर बाब आहे. त्यामुळे या विषयात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर खुलासा करावा. तसेच हे निवेदन खोटे असल्यास त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भांडारी यांनी केली आहे.
मुंबईतील वसई येथे 15 आणि 16 एप्रिलला जवळपास 50 हजार तबलिगी एकत्र जमणार होते. मात्र, राज्य सरकार आणि गृहविभागाने परवानगी नाकारली. पण, केंद्र सरकारने दिल्लीतील कार्यक्रमाला परवानगी कशी दिली ? राज्यात आणि देशात जो कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्यास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनी या विषयावर बोलायचं का टाळलं? डोवाल यांना भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मौलाना कुठं गायब झाले, मौलाना आता कुठं आहेत? असे सवाल देशमुख यांनी या निवेदनात उपस्थित केले होते.