मुंबई- मुंबईत बॉलिवूड ही एक वेगळी ओळख आहे. कारण महाराष्ट्र सरकारने बॉलिवूडच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या चांगल्या पायाभूत सुविधा आणि अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे मुंबईतून बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जाण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी, हे बॉलिवूड मुंबईतून इतर राज्यात जाण्याची कोणतीही शक्यता नाही, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
राज्यातील बॉलिवूड कुठेही जाण्याची शक्यता नाही - अनिल देशमुख
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज्यातील बॉलिवूड इतर राज्यात कुठेही जाण्याची शक्यता नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत
केंद्र सरकारने नुकतेच सोयाबीनच्या आयात करावर 20 टक्के करमाफी दिल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहे. ज्या सोयाबीनला 4 हजार 200 रुपयाचा भाव होता, आज तो तीन हजार 800 रुपयांवर येऊन पोहोचला असून यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आला असून केंद्र सरकारने सोयाबीनवरचा 20 टक्के आयात कर कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याचा फेरविचार करावा, अशी विनंती केंद्राला केली जाणार असून त्यासाठीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. केंद्र सरकारने एकतर सोयाबीनवरील आयात कर वाढवावा आणि राज्यातील शेतकऱ्यांना चांगले भाव मिळतील यासाठी खबरदारी घ्यावी, अशी विनंतीही केंद्राला केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.