मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस बिहार पोलिसांची अडवणूक करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली असून मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा निर्वाळा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. एकीकडे मुंबई महापालिकेने बिहार पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइन केले असल्याने वाद अधिकच वाढला आहे. मुंबई पोलीस बिहार पोलिसांची अडवणूक करत असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. राष्ट्रीय पातळीवर मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्यांनीही रान उठवले आहे. मुंबई पोलीस हा तपास करण्यासाठी घाबरत आहेत का? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या आणि आमदार राम कदम यांनी केला आहे, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. गृहमंत्री देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास विरोध करून फडणवीस यांची मागणी धुडकावून लावली आहे. एकंदर सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे.