मुंबई-बीडीडी चाळीतील पोलिसांना घरे खाली करण्यासंबंधीच्या नोटीस नुकत्याच गृहविभागाकडून पाठवण्यात आल्या आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या कामाला कुठेही सुरुवात झालेली नाही. तर कामाला कधी सुरुवात होणार? हा ही प्रश्नच आहे. त्यात पोलिसांच्या बीडीडीतील कायमस्वरूपी घराच्या मागणीचा मुद्दा प्रलंबित आहे, असे असताना घरे खाली करण्याच्या नोटीस पाठवल्या जात असल्याने पोलिसांच्या कुटुंबाकडून नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर आज अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. या नोटीस त्वरित रद्द कराव्यात आणि बीडीडीतील पोलिसांना पुनर्विकासात हक्काचे घर देण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी यावेळी वाघमारे यांनी गृहमंत्र्यांकडे केली. तर गृहमंत्र्यांनी नोटीस रद्द करण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तर पोलिसांच्या हक्काच्या घरांसाठी सकारात्मकता दर्शवल्याचे वाघमारे यांनी सांगितले आहे.
बीडीडीत सुमारे 3 हजार पोलिसांचे वास्तव्य-
ना.म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी अशा तीन चाळीत मिळून सुमारे 3 हजार पोलिसांची कुटुंब वास्तव्यास आहेत. यातील अनेक कुटुंबं मागील 20 ते 30 वर्षांपासून रहात आहेत. दरम्यान बीडीडी पुनर्विकासाची चर्चा सुरू झाल्यापासून पोलिसांच्या कुटुंबाकडून पुनर्विकासात आपल्यालाही मोफत हक्काचे घर द्यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र या मागणीवर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. तर यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे.
पुनर्विकासातील घरे गृहविभागाकडे हस्तांतरित होणार-
बीडीडी पुनर्विकासात पोलिसांना हक्काची मोफत घरे द्यावीत, अशी मागणी पोलिसांची आहे. मात्र यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुनर्विकासात जी 3 हजार घरे तयार होतील. ती गृह विभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. मग ती घरे निवास स्थान म्हणून वापरायची की ती पोलिसांना वितरित करायची, हा सर्वस्वी निर्णय गृहविभाग आणि राज्य सरकारचा आहे, असे धोरण म्हाडाचे आहे. दरम्यान पुनर्विकासासाठी पात्र रहिवाशांना आधी घरे खाली करून संक्रमण शिबीरात हलवण्यात येणार आहे. त्यानुसार म्हाडाने पोलिसांची घरे खाली करून घेण्यासाठी सेंच्युरी मिलमधील 172 गाळे संक्रमण शिबिराचे गृह विभागाला देण्यात आले आहेत.
घरे खाली करण्याच्या नोटीस-
172 संक्रमण शिबिरात पोलिसांना हलवण्यासाठी निवृत्त झालेल्या पोलिसांना तसेच काही पोलिसांनाही घरे खाली करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या नोटीसमुळे पोलिसांच्या कुटुंबात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वाघमारे यांनी बुधवारी या नोटीस मागे घेण्याची मागणी केली. तर हक्काच्या घरासाठी निर्णय घ्यावा, यासाठीही गृहमंत्र्यांना साकडे घातले. या दोन्ही मागण्यावर गृहमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. तर नोटीस रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच या नोटीस रद्द होतील, अशी माहिती वाघमारे यांनी दिली आहे.