मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेडमध्ये जाहीर सभा घेत आहेत. मोदी @9 या मिशन अंतर्गत ही सभा होत असली तरी सुद्धा या सभेमागे नांदेड जिल्ह्याची निवड करण्यासाठी काही विशेष कारण आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी चंद्रशेखर राव यांनी फेब्रुवारीमध्ये नांदेड येथे सभा घेऊन महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. या सभेमध्ये त्यांनी मोदी सरकार तसेच काँग्रेसवर सडकून टीका केली. केसी चंद्रशेखर राव हे भाजपसाठी सध्या मोठी डोकेदुखी असून त्यांना रोखण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी सुद्धा आजच्या सभेचे आयोजन केल्याचे राजकीय विश्लेषक चर्चा करत आहेत.
केसी राव यांची नांदेडमध्ये सभा :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेडमध्ये सभा घेत असून या सभेमध्ये ते कोणावर टीकास्त्र सोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी @9 या अनुषंगाने ही सभा होत असली तरी या सभेसाठी नांदेड जिल्ह्याची निवड करण्यामागे तशी अनेक विशेष कारणे आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी चंद्रशेखर राव व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यावरील असलेल्या वर्चस्वाला धक्का देणे हेच मुख्य कारण आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी चंद्रशेखर राव नांदेडमध्ये जाहीर सभा घेत भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.
बीआरएस महाराष्ट्राच्या राजकारणात :केसी चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यानंतर बीआरएसने महाराष्ट्राच्या राजकारणात पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. या सभेत महाराष्ट्रातील चार माजी आमदारांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. यामध्ये उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी, गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, यवतमाळचे राजू तोडसाम, ठाणे जिल्ह्यातील दिगंबर भिसे यांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनीही भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता. यामुळे भारत राष्ट्र समितीची राज्यात एंट्री झाली असल्याने इतर सर्वच पक्षांसाठी भारत राष्ट्र समिती ही पुढे आव्हान बनू शकते.