महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

13 जूनपर्यंत शाळा-शिक्षकांना सुट्टी, मात्र मुंबईतील शिक्षक ऑनड्युटी? - शिक्षकांना सुट्टी न्यूज

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून 13 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक स्वतंत्र परिपत्रक काढत सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबईतील शिक्षकांना गावाकडे न जाण्याचे आदेश दिले आहेत.

mumbai
मुंबई

By

Published : Apr 30, 2021, 10:32 PM IST

मुंबई -राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 13 जून, तर विदर्भातील शाळांना 28 जूनपर्यंत सुट्टी जाहीर केल्याचा आदेश आज (30 एप्रिल) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आला. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र, मुंबईतील शिक्षकांसाठी मुंबई महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रक काढत त्यांच्या सुट्ट्यांवर विरजन घातले आहेत.

13 जूनपर्यंत शाळांना सुट्टी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. सलग 13 महिन्यांपेक्षा जास्त काळ ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून 13 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी 1 मे पासून लागू होणार आहे. जूनमधील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर 28 जून रोजी शाळा सुरू होतील. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये 14 जूनपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यासारख्या सणांच्या सुट्ट्या समायोजनाने संबधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने जाहीर करण्यात येतील.

मुंबईतील शिक्षकांच्या सुट्ट्यांवर विरजण

एकीकडे राज्याच्या शिक्षण संचालनालयाकडून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना सुट्टी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक स्वतंत्र परिपत्रक काढत सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबईतील शिक्षकांना गावाकडे न जाण्याचे आदेश दिले आहेत. परिपत्रकात पालिकेने म्हटले आहे की, 'कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यासंदर्भातील उपाययोजनांसाठी विभाग स्तरावरून शिक्षकांची कोणत्याही क्षणी मदत घेण्यात येऊ शकते. कोणत्याही क्षणी कर्तव्यावर हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे मे 2021 च्या उन्हाळी सुट्टीमध्ये सर्व मुख्याध्यापक, इनचार्ज, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मुंबई सोडून आपल्या गावी जाऊ नये. कोविड कर्तव्यावर हजर न झाल्यास व कामात कुचराई केल्याचा ठपका ठेऊन कारवाई करण्यात येणार आहे'.

हेही वाचा-जालन्यात सेफ्टी टँक साफ करताना तीन कामगारांचा मृत्यू

हेही वाचा -मुलीच्या विनायभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी आईनेच मागितली 25 लाखांची खंडणी, आईला रंगेहात अटक

ABOUT THE AUTHOR

...view details