मुंबई- जळगाव जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहात महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत पोलिसांनी नाचायला लावले. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी ४ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
जळगाव जिल्ह्यातील संबंधित वसतिगृहात पोलिसांनी महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत नाचायला लावले. हा प्रकार अतिशय गंभीर असून शासकीय वसतिगृह असल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत व याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून त्याच्यामध्ये पोलिसांची भूमिका नेमकी काय होती हे कळणे गरजेचे आहे, अशी मागणी विधान परिषद शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि प्रसाद लाड यांनी केली. तसेच उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून त्यात सामाजिक संस्थांच्या महिला प्रतिनिधी यांचा देखील समावेश करण्याची मागणी केली.
चौकशीसाठी चार जणांची समिती
या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून न्याय व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. या समितीत मॅगेसेस पुरस्कार विजेत्या निलीमा मिश्रा आणि महिला कार्यकत्या वासंती दिघे यांच्या नेमणूक व्हावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, शासकीय समितीत बाहेरील सदस्यांची नेमणूक होत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रकरणी त्यांचे मत विचारात घेता येईल असे सांगण्यात आले.