मुंबई Historical School In Mumbai :मायानगरी मुंबई हे एक ऐतिहासिक शहर आहे. इथं तुम्हाला किल्ले, ब्रिटिशकालीन वास्तू पाहायला मिळतील. मुंबईतल्या काही इमारती या जागतिक वारसा स्थळात संरक्षित केलेल्या आहेत. अनेकांना फक्त 'गेटवे ऑफ इंडिया' किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक आदी मोजकी स्थळं ठाऊक असतील. मात्र, मुंबईत 132 वर्षे जुनी एक शाळा आहे. या शाळेत आजही तब्बल दोन हजार मुलं शिक्षण घेतात. अभिनेता स्वप्निल जोशी यानंही या शाळेत शिक्षण घेतलं आहे. 'बायरामजी जीजीभॉय पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूट' असं या शाळेचं नाव आहे. ऊन, पाऊस, वादळाचे तडाखे सोसत जीर्ण होत चाललेल्या या शाळेच्या ऐतिहासिक इमारतीची डागडुजी करुन ती ट्रस्टनं मूळ धाटणीत ती पुन्हा उभी केली आहे. वर्चूसा कॉर्पोरेशन आणि बी.जे.पी.सी. इन्स्टिट्यूशनच्या संयुक्त विद्यमानं हा प्रकल्प आकाराला आला.
मायानगरीतील 132 वर्षाची ऐतिहासिक शाळा :चर्नी रोड स्थानकाच्या अगदी विरुद्ध बाजूला या शाळेची ऐतिहासिक वास्तू उभी आहे. प्राचार्या वंदना नंबियार म्हणाल्या, सैफी हॉस्पिटलच्या अगदी बाजूलाच ही 132 वर्ष जुनी शाळा दिमाखात उभी आहे. दक्षिण मुंबईतलं चर्नीरोड या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनजवळून जाताना किंवा अगदी रेल्वे धावत असताना प्रवाश्यांची मान या शाळेची वास्तू पाहण्यासाठी वळत नाही, असं क्वचित घडत असेल. या शाळेची वास्तू मुंबईतल्या 132 वर्षांच्या शैक्षणिक, सामाजिक स्थित्यंतराची साक्षीदार आहे. शतकाहून अधिकच्या वाटचालीत या वास्तूने ऊन-पावसासह, सोसाट्याचा वारा, वादळाचे तडाखे सोसले. समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असल्यामुळे हवेतल्या आर्द्रतेचे प्रतिकूल परिणाम या इमारतीवर स्वाभाविकपणे व्हायला सुरुवात झाली होती. गतवैभव जपणारी ही वास्तू जुन्याच रुपात अधिक मजबूतपणे उभी राहावी, या उद्देशाने इमारतीच्या मूळ ढाचाला हानी न पोहोचवता इमारतीची आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. या कामासाठी ट्रस्टने काही कोटी रुपये खर्च केले.
गेली 15 वर्ष शिक्षणविषयक उपक्रमांना प्राधान्य देत वर्चूसा फाउंडेशननं एक सर्वंकष कार्यक्रम सुरु केला. त्या कार्यक्रमांतर्गतच हा प्रकल्प आकाराला आल्याची माहिती वर्चूसा कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक संतोष थॉमस यांनी दिली. या उपक्रमाविषयी अधिक सांगताना संतोष थॉमस म्हणाले, "आजवर या उपक्रमांचा लाभ 20हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना झाला आहे. आज या 132 वर्षे जुन्या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या वास्तूचं पुनरूत्थान करताना आम्हाला आमच्या मोहिमेतला एक पल्ला गाठता आला आहे. याच पुढच्या अनेक पिढ्यांमधल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना निश्चितच फायदा होईल.''
"एखाद्यानं खरंच समाजासाठी काही करायचं ठरवलं असेल, तर माणूस त्याच्यासाठी काय करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची शाळा आहे. आमच्या शाळेचे संस्थापकांच्या नावानं ही शाळा आहे. आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करायचं आहे, यासाठी त्यांनी पैसे वाचवायला सुरुवात केली. कुटुंबाचा सांभाळ, आपल्या मुलांचं शिक्षण, हे सर्व करत असतानाच त्यांनी इतर मुलांच्या शिक्षणासाठीदेखील पैसे वाचवायला सुरुवात केली," अशी माहिती शाळेच्या प्राचार्या वंदना नंबियार यांनी दिली.