मुंबई - बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत बृहन्मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान आज सामंजस्य करार करण्यात आला असून मुंबई महापालिकेची इमारत ही आता सामान्य नागरिक आणि पर्यटकांना पर्यटनासाठी खुली होणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात संपन्न झाला.
ही इमारत ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची आहे. या इमारतीला एक वेगळे महत्व आणि सौंदर्य आहे. पर्यटकांनी हे पाहिले पाहिजे. मुंबईला २४ तास कार्यरत ठेवणारे महापालिका प्रशासन कसे काम करते, हे पाहणे वेगळा अनुभव देणारे आहे. महापालिका इमारतीच्या हेरीटेज वॉकसाठी सामंजस्य करार झाल्याने आता सामान्य नागरिक आणि पर्यटकांना या इमारतीचे सौंदर्य आतून पाहता येईल, तसेच मुंबईच्या पर्यटनवाढीसाठी गेट वे ऑफ इंडियाच्या विकासासह इतरही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय पर्यटनासाठी आवश्यक असून त्याला चालना देण्याकरिता आदरातिथ्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेले परवाने किंवा परवानग्यांची संख्या आता ७० वरुन फक्त ९ वर आणली आहे, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले.