मुंबई - हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. त्यासाठी हे प्रकरण 'फास्ट ट्रॅक कोर्टा'कडे दिले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्वल निकम हे सरकारच्या वतीने पीडितेची बाजू मांडणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. पीडित तरुणीच्या प्रकृतीसाठी ठिकठिकाणी प्रार्थना होत असतानाच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज महत्त्वपूर्ण ट्विट केले आहे.