मुंबई - महाविकास आघाडी सरकार स्थापना आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. दोन वर्षात राम मंदिर, हिंदुत्वाचा मुद्दा, कोरोना, मराठा आरक्षण, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण, पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी प्रकरण, विरोधकांकडून सतत सुरू असलेले भ्रष्टाचाराचे आरोप या सारख्या विविध खाचखळग्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जावे लागले. एका आक्रमक पक्षाचा पक्षप्रमुख असतानाही तोल जाऊ न देता, ते सक्षमपणे मुख्यमंत्री पद भूषवत आहेत. तेही कोणताही प्रशासकीय सेवेचा अनुभव नसताना. आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ईटीव्ही भारतने घेतलेला शिवसेनेच्या वाटचालीचा हा आढावा.
शिवसेनेची सुत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गेली चार दशके शिवसेना नावाचा यज्ञ चेतवला. मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस एक केला होता. मात्र २००७ साली शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची सूत्रे शिवसेना पक्षप्रमुख म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली. त्यानंतर नारायण राणे, छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांनी पक्ष सोडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चतुर राजकारणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुळातच पठडीतल्या राजकारणी स्वभावाचे व्यक्तीमत्वच नव्हे. कलासक्त, सहिष्णू, संवेदनशील असे हे सौम्य स्वभावाचे एक दिलदार आणि मनमोकळे व्यक्तीमत्व! एक अतिशय उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून या माणसाने एका वेगळ्या प्रांतात आपल्या यशाचा ठसा उमटवला होता. कार्पोरेट क्षेत्रातला चेहरा लाभलेल्या या माणसाने जेव्हा सक्रिय राजकारणाची धुरा स्वीकारली तो काळ म्हणजे पक्षांतर्गत वातावरणातील धुमसत्या ज्वालामुखीवरचा काल होता. विषारी अन विखारी डावपेचांच्या आखाड्याचा होता. दरम्यानच्या काळात बऱ्याच उलथापालथी घडून गेल्या. संकटे कधी कधी एकटी-दुकटी येत नाहीत, पण अशी कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्यांचा धैर्याने मुकाबला करून ती यशस्वीपणे परतवून लावणारा खरा योद्धा असतो.
उद्धव ठाकरे हे असेच योद्धे असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. तसेच एक प्रगल्भ आणि चतुर राजकारणी आहेत. कुणाला कधी अंगावर घ्यायचे याचे पक्के आडाखे मनात तयार ठेवूनच त्यांची वाटचाल सुरू असते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना बाजूला करून पहाटेचा शपथविधी उरकून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला त्यांनी हे दाखवून दिले आहे. त्यासाठी भिन्न विचारसरणी असलेल्या काँग्रेस सोबत युती करून महाविकासआघाडी सरकार स्थापन करत स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मुळात हा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य असते. उद्धवजी काहीसे अबोल आहेत, मात्र ते स्पष्टवक्ते आहेत. भल्याभल्यांना त्यांनी एखाद्या नामांकित पैलवानाच्या थाटात धोबीपछाड लावून तोंडावर आपटत मी बोलणारा नव्हे, तर करून दाखवणारा आहे, याची प्रचीती आणून दिली आहे.
'अशी' झाली शिवसेनेची स्थापना
शिवसेनेच्या जन्माची बीजं मार्मिक साप्ताहिकाच्या माध्यमातून रुजली. १९ जून १९६६ रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. मराठी लोकांनी या 'संघटना' म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचे सदस्यत्व मिळावे यासाठी धडपड सुरू केली. सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. आज ५५ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन म्हटला तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सेनेची जन्मभूमी असलेल्या मुंबईत रीघ लावतात. गेल्या पाच दशकांचा हा इतिहास आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही साधेपणाने वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.
शिवसेनेचा राजकारणात प्रवेश
१९६७ साली शिवसेनेने ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या. शिवसेना शाखांकडे आपले प्रश्न सोडवण्याचे एक व्यासपीठ म्हणून लोक पाहू लागले.
शिवसेनेचा पहिला आमदार