मुंबई -राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातातनंतर मदत न मिळाल्यामुळे अपघातग्रस्तच्या मृत्यू होतो. त्यामुळे आता अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी यासाठी राज्य महामार्ग पोलिसांनी ‘हायवे मृत्युंजय दूत’ ही अभिनव योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
1 मार्चपासून अभियान सुरू
‘हायवे मृत्युंजय दूत’ या योजनेत गोल्डन अवर म्हणजे अपघाताच्या पहिल्या तासाभरात अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी म्हणून महामार्गांवरील हॉटेल कर्मचारी, पेट्रोलपंप कर्मचारी आणि नजीकच्या गावातील गावकऱ्यांना मृत्युंजय देवदूत नेमण्यात येणार आहेत. 1 मार्चपासून या अभियानाची सुरुवात होणार आहे. राज्यातील ठाणे, पुणे, रायगड व नागपूर परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आदेश देत प्रत्येक महिन्याच्या 15 व 30 तारखेस कारवाईचा अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे.
‘हायवे मृत्युंजय दूतांचे होणार प्रशिक्षण
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील सर्व मॉल, पेट्रोलपंप, लोकल ढाबे किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी आणि महामार्गाच्या आजुबाजूच्या गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार केला जाईल. या ग्रुपमधील सदस्यांना ‘मृत्युंजय देवदूत’ नावाने संबोधित केले जाईल. खासगी, सरकारी, निमसरकारी तसेच स्वयंसेवी संस्थेमार्फत या देवदूत व्यक्तिंना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणात अपघातग्रस्त व्यक्तिस कसे हाताळावे? कसे उचलावे? अशा सर्व बाबींचा समावेश असेल. देवदूताच्या प्रत्येक ग्रुपला एक स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्य देण्यात येईल. महामार्गाजवळच्या रुग्णालयांची नावे, पत्ते व संपर्क क्रमांक संबंधित देवदूतांना दिले जातील.
देवदूतांना मिळणार ओळखपत्र
‘हायवे मृत्युंजय देवदूत’ यांना महामार्ग सुरक्षा पथकाकडून संबंधित देवदूतांना ओळखपत्र दिले जाईल. चांगले काम केल्यास देवदूतांना प्रशस्तीपत्रही देण्यात येणार आहे. तसेच काही देवदूतांची नावे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या पुरस्कारांसाठी पाठविण्यात येतील.
हेही वाचा -मराठा आरक्षण सुनावणीच्या तयारीचा उपसमितीकडून आढावा