मुंबई -रेल्वे परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता देशातील ८१३ रेल्वे स्थानकांवर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. या हायटेक सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये ‘इंटरनेट प्रोटोकॉल' म्हणजे 'आयपी' असणार आहे. यात चेहऱ्यांना ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे एखादा माणूस गर्दीत घुसला तर त्याचा माग घेणे आता रेल्वे पोलिसांना शक्य होणार आहे. तसेच रेल्वेच्या सुरक्षेत वाढ होणार आहे.
५ हजार स्थानकांवर सीसीटीव्ही लावणार -
भारतीय रेल्वेकडून देशभरातील ८१३ प्रमुख रेल्वे स्थानकांवर आयपी आधारित सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिला आणि मुलांच्या सुरक्षेवर भर देत ४७ रेल्वे स्थानकांवर लावण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. भारतीय रेल्वे आणि रेलटेलने मार्च २०२२पर्यंत आणखी ७५६ रेल्वे स्थानकांवर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे नियोजन केले आहे. ए-1, ए, बी, सी, डी आणि ई दर्जाच्या स्थानकांवर हे हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय प्रिमियम गाड्यांचे कोचेस तसेच उपनगरीय लोकलमध्ये हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यात ५ हजार स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा -महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यात गोळ्या घातल्या पाहिजेत- उषा ठाकूर
केंद्रीयकृत नियंत्रण कक्षाची स्थापना -
रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने रेलटेल बरोबर करार केला होता. त्यानुसार रेलटेलकडून हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना ऑप्टिकल फायबर केबेलमधून नेटवर्क जोडण्यात आले आहे. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लाईव्ह व्हिडीओ फिड फक्त स्थानिक आरपीएफ ठाण्यातच नव्हे तर आता विभागीय मुख्यालयात आणि केंद्रीयकृत सीसीटीव्ही नियंत्रक कक्षातही पाहता येणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्हिडीओ फिल्डची देखरेख तीन स्तरांवर केली जाणार आहे. त्यासाठी रेलटेलकडून १४ झोनल रेल्वे स्थानकांवर केंद्रीयकृत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित झोन रेल्वेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे, अशी माहिती रेलटेलचे जनसंपर्क अधिकारी सुचरिता प्रधान यांनी दिली आहे.
चार प्रकारचे कॅमेरे -
हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे हे चार प्रकारचे आहे. ज्यामध्ये आयईपी कॅमेरे-डोम टाईप, बुलेट टाईप, पॅनल टिल्ट जूम टाइप आणि अल्ट्राएचडी-४ के कॅमेरांचा समावेश आहे. या कॅमेऱ्यांमध्ये चेहऱ्यांना ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. या हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडीओ फीड ३० दिवसांपर्यत साठवून ठेवता येणार आहे.
हेही वाचा -फादर स्टेन यांच्या मृत्यूला जबाबदार व्यक्तींवर कारवाई करा- विरोधी पक्षांची राष्ट्रपतींकडे मागणी