मुंबई:राज्यसभेच्या ( Rajya Sabha election ) महाराष्ट्रातील ( Maharashtra ) सहा जागांसाठी 10 जूनला फैसला होणार आहे. जागा सहा आणि उमेदवार सात झाल्याने निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. महाविकास आघाडी विशेषत: शिवसेना ( Shivsena ) आणि भाजपमध्ये ( BJP ) कोण बाजी मारणार हे या निवडणुकीतून सिद्ध येईल. दरम्यान, राजकीय हालचाली वेगाने होत असून शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेल द रिट्रीटमधून ट्रायडंट हॉटेलमध्ये हलविले आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या संख्येनुसार राज्यसभेवर सहा जण महाराष्ट्रातून निवडून जाणार आहेत. यात भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार निश्चितपणे निवडून येईल, असे संख्याबळ त्या त्या पक्षांकडे आहे. सहाव्या जागेसाठी मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा दिवस जवळ आल्याने महाविकास आघाडी आणि भाजपनेही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, राजकीय हालचाली वेगाने होत असून शिवसेनेने आज आपल्या आमदारांना हॉटेल द रिट्रीटमधून ट्रायडंट हॉटेलमध्ये हलविले आहे.
निवडणुकीत सुरवातीपासुनच रंगत निर्माण झाली आहे. सुरवातीला सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी व अपक्षांच्या मतांच्या जोरावर शिवसेनेने दावा केला आहे तर भाजपनेही आपल्याकडे असलेल्या अधिकच्या मतांच्या जोरावर आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार म्हणून कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना तर भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे.प्रथम संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. मात्र शिवसेना प्रवेशाला त्यांनी नकार दिल्यामुळे शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली आणि त्यांनी निवडणुकीतुन माघार घेतली.
288 आमदारांच्यासंख्याबळानुसार सहा जण राज्यसभेवर जाऊ शकतात. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या फेरीतील पहिल्या पसंतीची 42 मते आवश्यक आहेत. विधानसभेत भाजपचे 106 आमदार आहेत. याशिवाय काही अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. त्या जोरावर भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी सुमारे 13 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी काही मते कमी पडणार आहेत. काँग्रेसचे अतिरिक्त एक मत, राष्ट्रवादी काँग्रेसची 12 मते आणि शिवसेनेची अतिरिक्त 13 मते अशी 26 मते त्यांच्याकडे हमखास आहेत. सरकारला पाठिंबा दिलेल्या काही अपक्षांनी, छोट्या पक्षांनी पाठिंबा दिल्याचा दावा शिवसेना करत आहे. तथापि, शिवसेनेलाही आणखी 10-12 मतांची गरज आहे. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर सोमवारी झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांना सोमवारी रात्रीच 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यांना मंगळवारी दुपारी ट्रायडंट हॉटेलमध्ये नेण्यात आले. शिवसेनेच्या गोटात पूर्ण समाधान आहे निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेने आमदारांना हॉटेलमध्ये एका ठिकाणी ठेवले आहे. भाजप आणि काँग्रेसनेही आपापले आमदार हॉटेलमध्ये हलविल्याचेही सांगितले जात आहे.राज्यसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पियुष गोयल, डॉ. अनिल भोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर काँग्रेसने उत्तरप्रदेशातील नेते इम्रान प्रतापगढी यांना उमेदवार केले आहे.