मुंबई - कालपासून सर्वत्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून आज दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. आज दुपारी 2.56 वाजता विसर्जनादरम्यान समुद्राला मोठी भरती आहे. त्यामुळे विसर्जनादरम्यान समुद्रात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महानगरपालिकेने विशेष काळजी घेतली आहे. भाविकांनी विनाकारण समुद्र किनारी जाऊ नये व काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. आज दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गणेश मूर्तींचे विसर्जन करता यावे म्हणून पालिकेने 70 ठिकाणी सोय केली आहे. भाविकांनी आपल्या गणेश मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 168 कृत्रिम तलाव आणि 7 ते 8 वाहनांवर फिरती विसर्जन केंद्र पालिकेने उपलब्ध करून दिली आहेत.
दरम्यान, विसर्जनाच्या दिवशी भाविक समुद्राच्या ठिकाणी जाण्याची शक्यता असल्याने लाईफ गार्ड आणि मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. समुद्रात आज दुपारी 2.56 वाजता 4.47 मीटरची भरती आहे. यावेळी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार असल्याने समुद्राच्या ठिकाणी नागरिकांनी आणि भाविकांनी जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.