मुंबई : मुलुंड येथे सात मजली निवासी इमारतीला भीषण आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. अग्नीशमन विभागाने प्रयत्नांची शर्थ करत सुमारे 80 जणांना वाचविले आहे. तर तीन मुलांसह दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना मुलुंड पश्चिम येथील जागृती सोसायटीत १५ मार्च रोजी दुपारी २.५५ च्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
इमारतीचा संपूर्ण जिना धुराने भरलामुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने (MFB) एकूण 80 जणांना जिनेवरून टेरेसवर वाचवले. तर काहींना तळमजल्यावर खाली सुखरुप आणण्यात आले. त्यापैकी 10 जण पायऱ्यांवर बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले, ही माहिती अग्रवाल रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.आग ही निवासी इमारतीतील एका सामान्य विद्युत मीटरच्या केबिनमधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिक मेन केबल्स, सर्व मीटर्स, सर्व स्विचेस इत्यादींपर्यंत मर्यादित होती. मुंबई अग्निशमन दलाने ही आग आटोकाट प्रयत्न करून विझवली. आगीमुळे, इमारतीचा संपूर्ण जिना धुराने भरला होता. काही रहिवासी लॉबीमध्ये अडकले होते.