मुंबई - राज्यामध्ये बालविवाह होत आहेत आणि ते रोखण्यात अद्यापही शासन यशस्वी झालेले नाही. परिणामी यासंदर्भात वकील असीम सरोदे यांनी बालविवाह समस्येवर उपयोजना करण्यासाठी शासनाला आदेश देण्यासंबंधी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती आर एस डॉक्टर यांच्या खंडपीठाने शासनाला दोन ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. तसेच महिला बालकल्याण विभागाच्या मुख्य सचिव यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर करावे असे आदेशात म्हटले आहे.
शासन सर्वथा अयशस्वी -राज्यामध्ये दरवर्षी 7000 बालविवाह होतात आणि ते रोखण्यात शासन सर्वथा अयशस्वी होत आहे. अपयशी ठरत आहेत. वास्तविक 2016 मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा अनुषंगाने राज्य शासनाने नियमावली तयार होणे अपेक्षित होते. त्याचा आराखडा 2022 ला तयार झाला. आता 2023 मध्ये शासनाने त्याची नियमावली तयार करून मंजूर केली. याला प्रचंड उशीर झाल्याचे देखील याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयामध्ये खंडपीठासमोर मांडले. बालविवाह रोखण्याच्या संदर्भात अशी दिरंगाई जनहिताच्या दृष्टीने गंभीर आहे. हा देखील मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील अजिंक्य उडाणे यांनी मांडला.
महाराष्ट्र शासनाची भूमिका -बालविवाह रोखण्याचा प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, राज्यामध्ये 821 बालविवाह रोखण्यामध्ये शासनाने आपली कार्यवाही केलेली आहे. बालविवाह रोखण्याबाबतही आटोकाट प्रयत्न शासन करत आहेत. परंतु या मुद्द्याला आक्षेप घेत याचिकाकर्त्यांच्या बाजूने वकील अजिंक्य उडाणे यांनी शासनाला उच्च न्यायालयात प्रश्न केला की 'दरवर्षी 7000 बालविवाह होतात अशी माहिती आहे. आणि आपण केवळ 821 बालविवाह रोखले. परंतु ते पुरेसे नाही. न्यायालयाने ह्यावर शासनाला निर्देश द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.