मुंबई -भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्रीकर विभागाने जारी केलेल्या नोटीसविरोधात ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. या याचिकांवर गुरूवारी न्यायमूर्ती नितीन जामदार, न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या याचिकेवर विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी 6 फेब्रुवारी घेण्याचं निश्चित केलं आहे.
याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप - अनुष्कानं यापूर्वी याच मुद्यावर आपल्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र अनुष्का यावर स्वतः याचिका का दाखल करत नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. एखाद्या व्यक्तीनं कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली असं आतापर्यंत कधीही घडलेलं नाही असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर ती याचिका मागे घेऊन पुन्हा नव्यानं याचिका दाखल करण्याची मुभा देत याचिका निकाली काढली होती.