मुंबई- कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकूळच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आधीच लांबलेल्या निवडणुका अधिक काळ थांबवणे योग्य नाही, आता सर्वांनाच कोरोनासोबत जगायला शिकायला हवे, असे म्हणत पुन्हा हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती आर.डी. धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता या निवडणुका अधिक काळ थांबवता येणार नाहीत आपल्याला आता कोरोना सोबत जगायला शिकायला हवे असे स्पष्ट केले.
त्यामुळे आता या निवडणूक कार्यक्रमात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने अखेर संचालक मंडळाने यासंदर्भात दाखल केलेली आपली याचिका मागे घेतली. कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'च्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने 2 फेब्रुवारीला सहकारी संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यासंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढून गोकूळच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले होते.