मुंबई : नवाब मलिक यांनी विशेष रजा याचिकेचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज केला होता. तो फेटाळल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. विशेष रजा याचिका स्पेशल लिव्ह पिटीशन अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.
नवाब मलिक यांच्यावर कुख्यात दहशतवादी, अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी कुर्ला येथील जमीन खरेदीत देखील बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप ईडीने ठेवलेला आहे. अनेक महिने ते त्या आरोपात तुरुंगात आहेत. परंतु त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यामुळे वैद्यकीय कारणास्तव ते खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.
याच वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्या एक सदस्य खंडपीठापुढे अनेकदा सुनावणी झाली. परंतु त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला. म्हणून आता विशेष रजा याचिका आधारे सर्वोच्च न्यायालयात नवाब मलिक यांनी धाव घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतली आहे. ईडीकडून वैद्यकीय अहवाल कोणता, कुठे आहे? अशी विचारणा मागील सुनावणी मध्ये मुंबई उच्च न्यायालयात केली गेली होती.