मुंबई - मुंबईत येत्या 24 तासात शहर व उपनगरात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडतील अशी शक्यता कुलाबा वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईत आज(सोमवार) पडलेल्या पावसात पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद करण्यात आल्याची, 8 झाडे व फांद्या पडण्याच्या तसेच 2 ठिकाणी शॉकसर्किट झाल्याच्या घटना नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत येत्या 24 तासात पावसाच्या जोरदार सरींची शक्यता, वेधशाळेचा अंदाज - मुंबई पावसाळा बातमी
येत्या 24 तासात मुंबई शहरात व उपनगरात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडतील असा अंदाज कुलाबा वेध शाळेकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत आज सकाळपासून सायंकाळी 5.30 पर्यंत कुलाबा येथे 11.2 मिलिमीटर तर, सांताक्रूझ येथे 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत एका तासात अंधेरी पूर्व येथे 60 मिलिमीटर तर, अंधेरी पश्चिम येथे 58 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अंधेरी विभागात जोरदार पाऊस पडून पाणी साचल्याने अंधेरी सबवे काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, काही वेळाने पाणी कमी झाल्यावर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
आज दुपारी झालेल्या पावसादरम्यान मुंबई शहर विभागात 2, पूर्व विभागात 1 तर पश्चिम विभागात 5 अशी एकूण 8 झाडे आणि फांद्या पडल्या. तर, मुंबई शहर विभागात एक आणि उपनगरात एक अशा दोन ठिकाणी शॉकसर्किटच्या घटनांची आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे नोंद झाली. तर, झाडे पडणे व शॉकसर्किट या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.