महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबापुरीला पावसाने झोडपले; आता उसंत घेण्याची शक्यता - मुंबई पाऊस लेटेस्ट न्यूज

मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मागील 24 तासात कुलाबा वेधशाळेत 332 मिमी पावसाची नोंद झाली. ही आतापर्यंतची दुसरी उच्चांकी नोंद आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे रस्ता खचण्याची घटना घडली तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याचेही प्रकार घडले.

Mumbai Rain
मुंबई पाऊस

By

Published : Aug 6, 2020, 3:54 PM IST

मुंबई -गेल्या 24 तासात राजधानी मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई शहरात 332 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर उपनगरात 162.3 मिमी पावसाची नोंद झाली. या मोसमातील पावसाची ही उच्चांकी नोंद आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे रस्ता खचण्याची घटना घडली तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याचेही प्रकार घडले.

मुंबईतील मुसळधार पाऊस थांबण्याची शक्यता

सध्या मुंबईत काही प्रमाणात पाऊस थांबला असला तरी वाऱ्यांचा जोर कायम आहे. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळणे सुरूच आहे. साचलेले पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. समुद्रात भरतीची वेळ असल्याने आणि पुन्हा पाऊस पडल्यास शहरात पुन्हा पाणी साचण्याची शक्यता आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मागील 24 तासात कुलाबा वेधशाळेत 332 मिमी पावसाची नोंद झाली. ही आतापर्यंतची दुसरी उच्चांकी नोंद आहे. यापूर्वी 23 ऑगस्ट 1997 ला 346.2 मिमी अशी सर्वोच्च नोंद झाली होती. मागील दोन दिवसात मुंबईतील अनेक परिसरांमध्ये 200 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 100 किमीच्या जवळ होता. परिणामी अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या, अशी माहिती स्कायमेटने संस्थेने दिली.

येणाऱ्या काही दिवसात पाऊस अधूनमधून कोसळत राहिल. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आता कमकुवत झाले असून ते आता मध्य प्रदेशाच्या मध्य भागावर सरकले आहे. यामुळे मुंबई, उपनगर आणि गुजरातमध्ये पावसाचा वेग कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाची क्रियाशीलता साधारण 11 ऑगस्टपर्यंत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. माक्ष, त्या वेळेस मुंबई आणि उपनगरात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस नसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज सकाळी नोंदवलेले तापमान -

मुंबई शहर - कमाल 26.8 अंश सेल्सिअस व किमान 23 अंश सेल्सिअस

मुंबई उपनगर - कमाल 27 अंश सेल्सिअस व किमान 23 अंश सेल्सिअस

हवेतील आर्द्रता - 92 टक्के

गेल्या 24 तासात झालेला पाऊस -

मुंबई शहर - 331.8 मिलीमीटर

मुंबई उपनगर - 163.3 मिलीमीटर

मुंबईत 1 जूनपासून झालेला पाऊस - 2 हजार 404 मिलीमीटर

ABOUT THE AUTHOR

...view details