मुंबई- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा राज्यात सक्रीय झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवार पासून सुरू झालेल्या या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. राज्यातील या अतिवृष्टीचा आढावा घेणारा ईटीव्हीचा हा वृत्तांत...
मुंबई- मंगळवारी रात्री ८ वाजल्यापासून मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. सध्या मुंबईतील पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, येत्या १२ तासासाठी मुंबईसह ठाणे, रायगड कोकणला हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे. मुंबईत गेल्या २४ तासात कुलाबा येथे ११५.८ मिमी, सांताक्रुझ- ८६.५ मिमी, नवी मुंबईमध्ये १०० ते १२० मिमी. ठाण्यात ७८मिमी पावसाची नोंद झाली आहे.
LIVE : मुंबईला रेड अलर्ट... शहरासह उपनगरात पावसाचा जोर वाढला
पुणे- जिल्ह्यात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली. शहरासह जिल्ह्याला तुफानी पावसाने झोडपून काढले आहे. पुणे जिल्ह्यातील सोलापूर रस्त्यावरील गावांना उजनी धरणाच्या पाण्याचा फटका बसला आहे. तसेच पुणे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला होता. निमगाव केतकी येथे पूरपरिस्थितीमुळे 40 ते 50 नागरिक अडकले होते. त्यांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाहतानाचे दृश्य दिसून आले.
जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर तालुक्यांत मागील पंधरा दिवसांपूर्वी काढणीला आलेला बटाटा परतीच्या पावसाने चिखलात सडला आहे. सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे लागवड केलेला कांदाही वाहून गेला. काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याने बराखीत काढलेला कांदा भिजलाय.
- दौडमध्ये ४ जण वाहून गेल्याची घटना घडली आहे.
तसेच काल झालेल्या मुसळधार पावसाने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे शहरात झाड पडल्याच्या 10, तर विविध भागात पाणी साठल्याच्या 45 घटनांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात दोन दुचाकी वरीचार जण वाहून गेल्याचीही घटना घडली आहे.
पुणे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर सिंहगड रोड येथे पावसाच्या पाण्यात दुचाकीही वाहून गेल्या आहेत. पाऊस थांबल्यानंतरही काही भागात सकाळपर्यंत पाणी साचले होते. सिंहगड रोडवरील पानमळा परिसरात मोठ्याप्रमाणत पाणी साचले होत. रस्त्यांवरही पाणी साचल्याने वाहतुकीला आणि स्थानिकांना ये जा करण्यासाठी अडचण होत होती. दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर 133 मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
मुसळधार पावसाने इंदापूरला झोडपले; पुरात अडकलेल्या ४० ते ५० जणांना नेले सुरक्षितस्थळी