मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र , दक्षिण गुजरातचा किनारी भाग येथेही काही प्रमाणात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राहील. हवामान खात्याने याबाबत माहिती दिली.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे ३१ मे नंतर मुंबईच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतील. ५ जूनपर्यंत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हळूहळू गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे ३१ मे नंतर मुंबईच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येतील. १ जून पासूनच मान्सून पूर्व सरींचा वर्षाव सुरू होऊन समुद्रात वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये. ५ जूनपर्यंत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, ३० मे रोजीच केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे, असे स्कायमेटचे या खासगी हवामान संस्थेचे म्हणणे आहे. हवामान खात्याने मात्र, याला दुजोरा दिलेला नाही.