मुंबई -आज (गुरुवारी) मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत (2 आणि 3 जुलै) मुंबईत मुसळधार तर कोकणात अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
हवामानात बदल होत असून पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. पुढील पाच दिवस पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र पाऊस पडेल, असा अंदाज आहे. चक्रीय वाऱ्यांचे एक क्षेत्र दक्षिण गुजरात आणि त्या जवळील भागात तर दुसरे पूर्व उत्तर प्रदेश याठिकाणी कमी जास्त प्रमाणात आहे. ही परिस्थिती 4 जुलैपर्यंत या भागात असणार आहे. तसेच सोसाट्याचे पश्चिम किनारपट्टीवर 5 जुलैपर्यंत वाहतील. या प्रभावामुळे पुढील पाच दिवसात पाऊस सक्रिय होऊन तो मुसळधार स्वरूपात गुजरातमध्ये, पश्चिम किनार पट्टी आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पडणार आहे.
दरम्यान, बुधवारी मुंबईत सांताक्रुझ येथे कमाल 32.5 अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे 31.2 अंश सेल्सिअस तापमान होते. कुलाबा येथे सरासरी 81 टक्के आर्द्रता नोंदवण्यात आली. तर मुंबईत दोन दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक सरी बरसत आहेत.
पुढील हवामानाचा अंदाज -
- 2 जुलै - कोकण, गोवा आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
- 3 जुलै - गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
- 4 जुलै - तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
- 5 जुलै - कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता