मुंबई -येथे मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत मुसळधार..! रस्ते वाहतुकीवर परिणाम - mumbai rain transport
मुंबईत मुसळधार पावसामुळे येथील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मात्र, रेल्वे वाहतूक वेळेवर सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने तीन ते चार वेळा मुंबई तुंबली होती. आता पुन्हा हवामान विभागाने मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे सोमवारपासून थोड्या प्रमाणात पाऊस पडत होता. मात्र, मंगळवारी रात्री पावसाने जोर धरला. रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत मुंबई शहरात 56.62, पूर्व उपनगरात 21.41 तर पश्चिम उपनगरात 40.34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत मुंबई शहरात 73.52, पूर्व उपनगरात 27.87 तर पश्चिम उपनगरात 78.68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे मुंबईमधील दादर हिंदमाता, किंग सर्कल, परेल, अंधेरी, मालाड, वांद्रे, गोरेगाव आदी सखल भागात पाणी साचले आहे. तर येथील बेस्ट बसची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. मात्र, रेल्वे वाहतूक वेळेवर सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.