महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईला पावसाने झोडपले, पाणी साचल्याने बेस्ट वाहतूक वळवली - हवामान विभाग

मागील चार दिवसांपासून मुंबई व उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. पाणी साचल्याने पश्चिम उपनगरांतील चारही सबवे बंद करण्यात आले.

मुंबईला पावसाने झोडपले

By

Published : Jul 26, 2019, 10:18 PM IST

Updated : Jul 26, 2019, 11:11 PM IST

मुंबई - गेल्या चार दिवसांपासून शहरात पाऊस हजेरी लावत आहे. पावसाने आज संध्याकाळी कामावरून घरी परतणा-या चाकरमान्यांना चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. पाणी साचल्याने पश्चिम उपनगरांतील चारही सबवे बंद करण्यात आले. पूर्व दृतगती मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. तीनही मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले.

मुंबईला पावसाने झोडपले

मागील चार दिवसांपासून मुंबई व उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशा-यामुळे शुक्रवार २६ जुलैची आठवण करुन देणारा पाऊस ठरतो की काय, या भीतीने धास्तावलेल्या मुंबईकरांनी वेळेत घरचा रस्ता धरला होता. संध्याकाळी साडेपाचनंतर वा-यासह पावसाने जोरदार कोसळण्यास सुरुवात झाली. घरी परतणा-या मुंबईकरांची ट्रेन, बस पकडण्यासाठी धावपळ उडाली. पश्चिम उपनगरांत मालाड, अंधेरी खार व मिलन सबवेवर पाणी साचले. दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल, लोअरपरळ, सायन, धारावी, वांद्रे, कुर्ला, चेंबूर, काळाचौकी, अंधेरी, दहिसर, बोरीवली, गोरेगाव या सखल भागांत पाणी साचल्याने बेस्ट वाहतूकही वळवण्यात आली. त्यामुळे अनेकांनी खासगी वाहनांनी घर गाठले. पावसाने संततधार कायम ठेवल्याने रेल्वेच्या तीनही मार्गांवर १५ ते २० मिनिटे रेल्वे उशिराने धावत होत्या. रस्ते वाहतूक ठप्प त्यात रेल्वे उशिरा धावल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. रेल्वे स्थानकातील फलाटे प्रवाशांनी तुडुंब भरल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. इस्टर्न फ्रीवेवर पाणी भरल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. हिंदमाता येथे गुडघाभर पाणी साचले होते. तर सायन, किंग्ज सर्कल येथे पाणी भरल्याने परिसरात तलावाचे स्वरुप आल्याने काही वाहने अडकली होती.

मुसळधार पावसाचा इशारा

सकाळी ८ ते सायंकाळी सातवाजेपर्यंत शहरात ३८ मिमी, पूर्व उप नगरांत ५८ मिमी तर पश्चिम उपनगरांत ४६ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Last Updated : Jul 26, 2019, 11:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details