मुंबई- मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. आज दुपारपासून मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. काल वातावरणात झालेल्या बदलांमुळे हवामान खात्याने मुंबई आणि परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात मेघगर्जनेसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील 3 ते 4 तासात मुंबई शहरात 50 मि.मी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. रडारने काढलेल्या छायाचित्रांनुसार मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरावर ढग दाटून आले आहेत. या ठिकाणी जोरदार पाऊस होईल. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होण्याची परिस्थिती आहे, असे ट्विट प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी केले आहे. त्याचबरोबर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अतिमूसळधार पावसाचा अंदाज असल्याने हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, उपनगर आणि ठाण्यात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीतही येत्या दोन दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यातील काही भागात जोरदार सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
4 ते 5 ऑगस्ट दरम्यान गोव्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर, 6 ऑगस्टला कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, 7 ऑगस्टला कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.