मुंबई -महाराष्ट्र भूषण पुरस्कारादिनी झालेल्या दुर्घटनेबाबत चौकशीची मागणी सर्व पक्षाकडून होत होती. या घटनेमध्ये १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १० महिला व ४ पुरुषांचा समावेश आहे. या संदर्भामध्ये विरोधकांकडून वाढता दबाव लक्षात घेऊन सरकारने अखेरकार यासंदर्भात एक सदस्यीय समितीची घोषणा केली आहे.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव -मागच्या रविवारी खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता सरकारकडून एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. तसेच भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल. असेही सांगण्यात आले आहे.
विरोधकांचा वाढता दबाव -मागच्या रविवारी खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याबाबत समाज माध्यमावर चित्रफित प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या व यामध्ये हे मृत्यू चेंगराचेंगरीतून झाल्याचा आरोप काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून सरकारवर सातत्याने दबाव वाढत आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. तर दुसरीकडे याप्रकरणी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. खासदार संजय राऊत हे तर या प्रश्नावर दररोज सरकारवर निशाणा साधत असून याप्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सुद्धा निशाणावर धरले आहे. एकंदरीत या प्रश्नावर विरोधकांचा वाढता दबाव पाहता अखेरकार सरकारने एक सदस्य समिती नियुक्ती केली आहे.
समितीवर प्रश्नचिन्ह? -सरकारने ही एक सदस्य समिती नेमून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असला, तरी सुद्धा या समितीवरूनच विरोधक आक्षेप घेणार यामध्ये दुमत नाही. इतक्या मोठ्या प्रकरणाची चौकशी एक सदस्य समिती कशी करू शकते? हा सुद्धा प्रश्नच आहे. तसेच या प्रकरणातील तथ्य लपवण्याचा सरकार खुद्द प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना या एक सदस्य समितीवरच सरकारकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जाणार आहेत.
हेही वाचा -Kharghar Heatstroke Deaths: महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला, जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे नवा वाद