मुंबई:आमदार हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज याआधी मुंबई सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला होता. आता मुलांना देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जातोय की काय? याची धास्ती लागली आहे. जेव्हा हसन मुश्रीफ यांच्याबाबतचा कोणताही निकाल लागेल त्या निकालाचे परिणाम त्यांच्या तीनही मुलांच्या निकालावर होणार असल्याची दाट शक्यता आहे.
जामिनावर उद्या सुनावणी: हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी आहे. तसेच अंतरिम दिलासा द्यावा म्हणून देखील त्यांच्या दुसऱ्या याचिकेची सुनावणी आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या मुलांच्या याचिकेचे भविष्य यांच्या उद्याच्या न्यायालयीन निकालानंतर स्पष्ट होईल. मुश्रिफांची तीनही मुले साजिद, आबिद आणि नाबित यांना अटकेपासून संरक्षण मिळते किंवा नाही, हे उद्या स्पष्ट होईल.
हे आहे 'ईडी'चे मत: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या बाबतीत अटकपूर्व जामीन देण्यासाठी विरोध केलेला आहे. त्यांनी सातत्याने आपली बाजू मांडलेली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामध्ये या तीनही मुलांचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे दिसते. तसेच चार्टर्ड अकाउंटंट महेश गुरव यांचा देखील सहभाग असल्याचे म्हणणे आहे. या आधारेच त्यांना अटकेपासून संरक्षण देता कामा नये, असे मत 'ईडी'ने न्यायालयापुढे मांडले आहे.