मुंबई -मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाच्या सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली होती. आता दुसऱ्या डोसकडेही आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. आज बुधवारी 393, तर आतापर्यंत 676 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मुंबईत आज मंगळवारी 8400, तर आतापर्यंत एकूण 1 लाख 34 हजार 025 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे लसीकरण स्थगित करण्यात आले होते. मात्र, 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत बुधवारी 27 लसीकरण केंद्रांवर 105 बूथवर 3000 आरोग्य कर्मचारी, तर 5775 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना, अशा एकूण 8775 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यात 1767 आरोग्य कर्मचारी, तर 6633 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दरम्यान, 3 जणांना सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत 95,072 आरोग्य आणि 38,953 फ्रंटलाईन, अशा एकूण 1 लाख 34 हजार 25 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यात 95,072 आरोग्य आणि 38,953 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.