मुंबई : सैफी रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये घेतलेल्या इंजेक्शनमुळे मंत्रालयात काम करणारे विवेक कांबळे यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात केलेल्या तपासणीत, संबंधित मेडिकलमध्ये मोठा साठा मिळाला. परंतु, औषध निर्मिती आणि विक्री केल्याची कुठेही नोंद आढळली नसल्याची धक्कादायक बाब विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या निदर्शनास आणून दिली. दानवे म्हणाले, की सुमारे चार हजार पाचशे बनावट विक्री झाली आहे. मुंबईत अशा प्रकार वाढले असून ऑनलाईन विक्री सुद्धा होत आहे. तसेच, ग्रामीण भागात देखील अशाच पद्धतीने बनावट विक्री होत असल्याचे दानवे म्हणाले आहेत.
औषध विक्री दुकानातील बनावट औषधे : आमदार अनिल परब यांनी मुंबईतील बनावट औषध विक्री करणाऱ्यांची साखळी संघटित गुन्हेगारी आहे. याला मोक्का कायदा लावावा आणि संबंधित मृत्यू प्रकरणी दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुंबईतील सैफी रुग्णालयाच्या बाजूच्या औषध विक्री दुकानातील बनावट औषधे आणि इंजेक्शनचा मुद्दा मांडला होता. अभिजीत वंजारी, अनिल परब यांनी, बेकायदा औषध निर्मितीवरून सरकारवर टीकेची झोड उठवली.