मुंबई- 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आले. मात्र, लसीकरण करण्यासाठी राज्याला योग्य लस पुरवठा उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षाही आरोग्य मंत्र्यांनी बोलून दाखवली आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा सर्व भार आता केंद्र सरकार उचलणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने उचललेल्या या पावलाचे स्वागत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. मात्र, लसीकरणासाठी राज्यात कमी पडत असलेल्या लसीचा अनुभव लक्षात घेता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लस कमी पडू नये, अशी अपेक्षा असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी बोलून दाखवले. पंतप्रधान किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्यासोबत देशातील सर्व आरोग्य मंत्र्यांच्या ज्यावेळी बैठका होत्या त्या, सर्व बैठकांमध्ये केंद्र सरकारने लसीकरणाबाबत जबाबदारी घ्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्याच मागणीला केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी ही मागणी पूर्ण केल्याने त्याचे स्वागत त्यांनी केले आहे. तसेच राज्य सरकार सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी तयार होते. मात्र, लसच उपलब्ध होत नसल्याने राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची कोंडी होत असल्याचेही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कबूल केले. तसेच ग्लोबल टेंडर राज्य सरकारकडून जरी काढण्यात आली असली तरी, सर्वच विदेशी कंपन्यांकडून लस थेट केंद्र सरकारला दिली जाण्याबाबत आग्रही होते. त्यामुळे राज्य सरकारच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळत नव्हता, असे मत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये लस होणार उपलब्ध
कोविशिल्ड आणि को-वॅक्सीन लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या सीईओ सोबत चर्चा सुरू असून जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे. तसेच स्पुतनिक व्ही लस निर्मिती करणाऱ्या कंपनी सोबतही चर्चा सुरू असून त्याच वेळेदरम्यान स्पुतनिक व्ही लसही उपलब्ध होईल, अशी आशा आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. दिवसाला दहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता राज्य सरकारची असल्याचे देखील यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
नियम शिथील केले असले तरी, ते पाळणे महत्त्वाचे
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सात लाखांच्यावर गेली होती. मात्र, आता हीच रुग्ण संख्या जवळपास एक लाख 74 हजारावर आलेली आहे. तर कोरोना रुग्णांच्या रिकवरी रेट हा 95 टक्के एवढा झाला आहे. तर राज्यात दोन कोटी 44 लाख नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. मात्र, तरीदेखील सर्व नागरिकांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत, असे आवाहनही आरोग्य मंत्र्यांकडून करण्यात आले आहे.