महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राला म्यूकरमायकोसिसचा विळखा; 1500 पेक्षा अधिक रूग्णांचे निदान - म्यूकरमायकोसिस राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोनानंतर म्यूकरमायकोसिस या आजाराने थैमान घातले आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, नांदेड, वाशिम या जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस आजाराचे रूग्ण आढळले आहेत. तर, म्यूकरमायकोसिसचे महाराष्ट्रात पंधराशेहून अधिक रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

mumbai
मुंबई

By

Published : May 13, 2021, 8:41 PM IST

Updated : May 14, 2021, 12:17 AM IST

मुंबई - एकीकडे कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. 2020 पासून कोरोनाने उद्रेक सुरू केला आहे. आजवर कित्येक लोकांचा जीव कोरोनाने घेतला आहे. यामुळे जगभरात लॉकडाऊनची वेळ आली. यामुळे अनेकांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता म्यूकरमायकोसिस या आजाराने तोंड वर काढले आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील शहरांसह ग्रामीण भागातही या आजाराचे रूग्ण आढळू लागले आहेत. नाशिक, कोल्हापूर, पुणे, नांदेड, वाशिम या जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस आजाराचे रूग्ण आढळले आहेत. तर, म्यूकरमायकोसिसचे महाराष्ट्रात पंधराशेहून अधिक रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे

● नाशिक जिल्ह्यातील येवला येथे या आजाराचे 4 तर लासलगावमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना पुढील उपचाराकरिता नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. येवल्यातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अविदत्त निरगुडे यांनी याची माहिती दिली आहे.

● कोल्हापूर जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचा 7 रुग्णांना संसर्ग झाल्याचा संशय आहे. त्या संशयित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये गंभीर आजार किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांचाच समावेश आहे. याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली आहे.

● पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये म्यूकरमायकोसिसचे सुमारे 1 हजार रुग्ण आढळले आहेत.

● नांदेडमध्ये सद्यस्थितीत म्यूकरमायकोसिसचे जवळपास 50 ते 60 रुग्ण आढळून आले आहेत. येथील गंभीर रुग्णांना ऑपरेशनसाठी औरंगाबाद, हैदराबाद, लातूर, पुणे येथे पाठवले जात आहे.

● वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या एका 62 वर्षीय महिलेचा म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. त्या महिलेच्या डोळ्यांची हालचाल होत नव्हती. चाचणी अहवालातून तिला म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर या महिलेला डॉक्टरांनी अकोल्याला जाण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा या महिलेचा मृत्यू झाला.

औरंगाबादमध्ये भीतीचे वातावरण

औरंगाबादमध्ये भीतीचे वातावरण

औरंगाबादमध्येहीकोरोनानंतर बुरशीजन्य आजार होण्याची भीती नागरिकांमध्ये वाढली आहे. त्यामुळेच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. प्रत्येक 2 जणानंतर एक रुग्ण हा भीतीपोटी डॉक्टरांकडे येत असल्याची माहिती औरंगाबादचे नेत्रतज्ज्ञ डॉ. राजीव मुंदडा यांनी दिली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

'ज्या रुग्णांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी आहे. अशा रुग्णांना म्यूकरमायकोसिस आजार जडतो. या आजारामुळे रुग्णांच्या नाक-कान-घसा आणि डोळे याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असल्याचं दिसून आला आहे. या आजारावर रामबाण औषध म्हणून एम्फोटेरेसींन-बी हे इंजेक्शन आहे. मात्र सध्या या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असल्याने या इंजेक्शनची किंमत जवळपास 10 हजार रुपयापर्यंत गेली आहे. प्रत्येक रुग्णाला जवळपास 10 ते 12 इंजेक्शन लागत असल्याने या आजाराचा उपचार देखील मोठा खर्चिक होत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची किंमत लवकरात लवकर कमी करून निर्धारीत करण्यात यावी', अशी मागणीही महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

आज (13 मे) राजेश टोपे आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये म्यूकरमायकोसिस या नवीन आजारावर चर्चा झाली. या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलले पाहिजे, यासंबंधीचं मत राजेश टोपे यांनी हर्षवर्धन यांच्याकडे व्यक्त केले.

म्यूकरमायकोसिस रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत होणार उपचार

राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या आजारावर उपचार केले जाणार आहेत. मात्र या आजाराच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागणार असल्याचे यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच या रोगाबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. त्यामुळे या रोगाबद्दल जनजागृती करणे ही गरजेचं असल्याचं यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. एम्फोटेरेसींन-बी इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याची गरज असून त्या उत्पादनाचा अधिक कोटा महाराष्ट्राला देण्यात यावा, असंही यावेळी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सांगितले.

'म्यूकरमायकोसिस हा आजार गंभीर'

'म्यूकरमायकोसिस हा आजार गंभीर आहे. वेळीच उपचार केला नाही तर डोळा निकामी होऊ शकतो किंवा मृत्यूही ओढावू शकतो. माती, हवा, कुजलेल्या ठिकाणी बुरशी असते. बुरशी नाकाद्वारे शरीरात प्रवेश करते. नाकाच्या मागच्या बाजूला सायनस या ठिकाणी ही बुरशी जमा होते. ती वाढत जाऊन मेंदूपर्यंत शकते. इन्फो टेरेसिन हे औषध या काळी बुरशी आजारावर परिणाम कारक आहे', असे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांनी म्हटले आहे.

काय आहे म्यूकरमायकोसिस?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्यूकरमायकोसिस हा आजार नव्हता. मात्र दुसऱ्या लाटेत मधुमेही कोविड रुग्णांमध्ये हा आजार जाणवत आहे. हा संसर्गजन्य आजार नाही. मात्र, वेळीच त्याचे निदान होवून त्यावर उपचार अथवा शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण कायमस्वरुपी बरा होवू शकतो. या आजाराची लक्षणे सांगायचे झाल्यास कोरोना रुग्णाच्या चेहऱ्यावर डोळ्याला सूज येणे, दिसायला बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायला त्रास होणे, अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. जर अशी लक्षणे दिसली तर जवळच्या कान, नाक, घसा तज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरू करणे गरजेचे आहे, अन्यथा आजार बळावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

काय बाळगावी सावधगिरी?
● अशी लक्षणे आढळून आल्यास लगेच तज्ज्ञ डॉक्टर्स जसे की, कान, नाक, घसा तज्ज्ञ/डेंटल सर्जन/नेत्ररोग तज्ज्ञ यांचा सल्ला घेवून पुढील उपचार सुरू करावेत.
● हे उपचार खर्चिक आहेत पण मोठ्या शहरांमध्ये जसे की पुणे, मुंबई, हैदराबाद येथे यांचे खास म्यूकरमायकोसिस क्लिनिक आहेत, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे.
● शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे, निरोगी जीवनशैली अवलंबणे.
● रस्त्याचे खोदकाम किंवा ओल्या मातीचे खोदकाम अशा ठिकाणी जाणे टाळावे, कारण ही बुरशी निसर्गातूनच आढळून येते. फ्रिजमध्ये खूप दिवसांचे अन्न जमा करणे अशा गोष्टी टाळाव्या, भिजलेले लाकूड किंवा बुरशी आलेले ओले फर्निचर घरातून काढून टाकावे.
● मास्क लावणे, सॅनिटायझेशन करणे या गोष्टीही नियमित सुरू राहू द्याव्या.

हेही वाचा -महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळला बसणार चक्रीवादळाचा तडाखा

Last Updated : May 14, 2021, 12:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details