मुंबई : जगभरात हाहाकार निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार तीन वर्षानंतरही कायम आहे. मार्च पासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. रुग्णसंख्या रोजच वाढू लागली आहे. कोरोनाचा एखादा नवा व्हेरियंट आला असावा किंवा अँटीबॉडीज स्थर खालावला असावा त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत असावी, अशी शक्यता आरोग्य विभागातील तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जात आहे.
कोरोना पुन्हा वाढतोय :कोरोनाचा पहिला रुग्ण 2020 मध्ये आढळून आल्यापासून गेले तीन वर्षे आरोग्य विभाग कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे काम करत आहे. या कालावधीत कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या. या तीन लाटा परतवून लावण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. गेले काही महिने रुग्ण संख्या स्थिर होती. त्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आणि मार्चपासून पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. रोज रुग्णसंख्या वाढत असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
अँटीबॉडीजचा स्थर खालावला :कोरोनाने आपल्यामध्ये सतत बदल घडवले आहेत. आतापर्यंत कोरोनाचे अनेक व्हेरियंट आढळून आले आहेत. या व्हेरियंट मुळे त्या त्या वेळी रुग्णसंख्या वाढलेली दिसली आहे. आताही एखादा नवीन व्हेरियंट असावा. तसेच नागरिकांनी कोरोना विरोधातील लस घेऊन सुमारे दिड वर्षाचा कालावधी झाला आहे. या कालावधीत लसीमुळे निर्माण झालेल्या अँटीबॉडीजचा स्थर खालावला असावा. एखादा आजार वाढल्यास मानवाच्या पेशींमधील स्मृतीमध्ये असलेल्या अँटीबॉडीज पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतात. यासाठी काही कालावधी जायला लागतो. आताही काही वेळ लागेल तो पर्यंत रुग्णसंख्या वाढेल. मात्र, अँटीबॉडीज ऍक्टिव्ह झाल्यानंतर रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिली.