मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून आज या ठिकाणी लोकार्पण होत असलेले आरोग्य केंद्र हे त्या एक प्रयत्नाचा भाग असून हे आरोग्य केंद्र नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी केले. या आरोग्य केंद्राचा लाभ बोरिवली मागाठाणे आदी विभागातील नागरिकांना होणार आहे.
नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आरोग्य केंद्र उपयुक्त - मुंबई महापौर - महापौर किशोरी पेडणेकर न्यूज
बोरिवली पूर्वच्या मागाठाणे बस डेपो समोरील आरोग्य केंद्राचे डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य केंद्र असे नामकरण व लोकार्पण महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून आज या ठिकाणी लोकार्पण होत असलेले आरोग्य केंद्र हे त्या एक प्रयत्नाचा भाग असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी सांगितले.
बोरिवली पूर्वच्या मागाठाणे बस डेपो समोरील आरोग्य केंद्राचे डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य केंद्र असे नामकरण व लोकार्पण महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, आमदार विलास पोतनीस, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी,सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, आर मध्य व आर उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, स्थानिक नगरसेविका गीता सिंघण आदी मान्यवर उपस्थित होते.
आनंदीबाई जोशी समर्पक नाव -
महापौर किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, या आरोग्य केंद्राला डॉक्टर आनंदीबाई जोशी असे समर्पक नाव दिले असून या आरोग्य केंद्रामध्ये लहान मुलांच्या लसीकरणा सोबतच सर्व प्रकारच्या संसर्गजन्य आजारावर उपचार केले जाणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले. कोरोनाच्या काळामध्ये जास्तीत जास्त काम सर्व नगरसेवकांनी केली असून बृहन्मुंबई महानगरपालिकेला चांगली साथ दिल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोनाची संख्या कमी जरी झाली असली तरी संकट अजून पूर्णपणे टळले नसून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली. त्यासोबतच येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
ठाणे शहराला जोडणाऱ्या बोगद्याचे स्वप्न पूर्ण होणार -
स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे मार्गदर्शन करताना म्हणाले की, मागाठाणे विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त विकास कामे करण्यावर आम्ही भर दिला असून नगरसेविका सिंघण यांनी सांगितलेली विकास कामे आम्ही पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच नॅशनल पार्कच्या खालून जाणारा व ठाणे शहराला जोडणाऱ्या बोगद्याच्या कामाचा पाठपुरावा अंतिम टप्प्यात असून हे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.