मुंबई:नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीच्या कार्यपद्धतीविषयी अधिक माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पीडितांना फोन करून सांगायचे की, तुम्ही ड्रग्ज भरून पाठविलेले कुरियर पकडले गेले. आता त्यांना अटक केली जाणार आहे. यानंतर टोळीतील सदस्य पीडितांना अटक टाळण्याचे सांगत त्यांच्याकडून वाटेल तितके पैसे उकळत होते.
अशा प्रकारे करायचे लुबाडणूक: तपासादरम्यान, या तोतया पोलीस रॅकेटचा मुख्य सूत्रधार परदेशात आहे तर त्याचे हस्तक भारतात असल्याचे समजले. टोळीतील सदस्य पीडितांना व्हॉट्सअॅप आणि स्काईपद्वारे कॉल करायचे. ज्यावर डीपी हा वरिष्ठ 'आयपीएस' अधिकाऱ्यांचे असायचे. त्यामुळे पीडित नागरिक घाबरून जात असत. अशी अनेक प्रकरणे मुंबई, पुणे आणि चिंचवडसारख्या इतर शहरांमध्ये अलीकडच्या काळात नोंदविण्यात आली आहेत; परंतु कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. अखेर बांगूरनगर पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. त्यांनी मुख्य सूत्रधार डी. श्रीनिवास राव (४७) याच्यासह पाच आरोपींना अटक केली आहे. रावला शनिवारी विशाखापट्टणममध्ये पकडले होते.
महिलांचीही लुबाडणूक: राव हा कमिशन तत्त्वावर काम करत होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याचे भासवून या टोळीने दोन महिलांना सायबर क्राईम कार्यालयात बोलावले. यानंतर त्यांच्यासाठी असलेल्या कुरियरमध्ये ड्रग्ज सापडल्याचा दावा केला होता. त्यांना अटक करण्याची धमकी दिल्यानंतर, महिलांनी घाबरून आरोपींना जवळपास ६ लाख ८९ हजार रुपये दिले. ही बाब पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या टोळक्याचा माग काढण्यासाठी एक पथक तयार केले. शेवटी मुख्य आरोपी रावला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बनावटी पोलिसाला मुंबईतून अटक: मुंबईत पोलिसांचा गणवेश घालून पोलीस असल्याचे सांगून मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना गंडवणाऱ्या एका तोतया पोलीस अधिकाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी 14 एप्रिल, 2023 रोजी अटक केली होती. कैलास खामकर असे या आरोपीचे नाव होते. तो घाटकोपर परिसरात राहतो. बनावट पोलीस ओळखपत्रासह आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळ पोलिसांप्रमाणे पल्सर १८० दुचाकी होती. त्यावर पोलीस नावाचे स्टिकर, पोलिसांप्रमाणे हॅल्मेट व पोलिसांप्रमाणे बनावट ओळखपत्र देखील आढळून आले होते. त्यामुळे त्याच्यावर फार कुणाला संशय येत नसे. तसेच छोट्या मोठ्या दुकानात जाऊन हा आरोपी किरकोळ साहित्य कारवाईच्या नावावर दुकानदारांकडून फुकट घेऊन जात होता.
हेही वाचा:Sharad Pawar Political Decisions : पक्षाविरोधातच केले होते बंड; शरद पवारांचे 'हे' महत्वपूर्ण राजकीय निर्णय