मुंबई HC Grant Bail To Terror Accused : दहशतवादी कारवायात सहभागी असल्याच्या आरोपावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेनं वांद्य्रातील टेलर इरफान शेखला अटक केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं इरफान शेखला जामीन मंजूर केला. त्याबाबतची महत्त्वपूर्ण ऑर्डर सोमवारी न्यायालयानं जारी केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं 2021 मध्ये झाकीर हुसेन तसेच इरफान शेखला अटक केली होती. मात्र या अटकेविरोधात इरफान शेखनं जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court) अर्ज दाखल केला होता. त्याच्यावर बेकायदा प्रतिबंधात्मक कायदा युएपीए अंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.
झाकीर हुसेनला घरात राहण्यासाठी दिली जागा :इरफान शेखनं गुन्हेगार असलेल्या झाकीर हुसेनला आपल्या घरात राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. झाकीर त्याच्या घरी आल्यानंतर त्याला काही पैसे देऊन मदत केल्याचाही आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणांनी इरफान शेखवर केला आहे. झाकीर सारख्या एका आरोपीला घरात लपण्यासाठी जागा दिली, त्यामुळे दहशतवादी गटामध्ये इरफान शेखचाही सहभाग असल्याचा राष्ट्रीय तपास एजन्सीचा आरोप होता.
राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दाखल केला होता गुन्हा :राष्ट्रीय तपास यंत्रणेनं युएपीए कायद्यांतर्गत मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात इरफान शेखवर गुन्हा नोंदवला होता. मात्र या खटल्यात तपास यंत्रणांचा इरफान शेखला जामीन नाकारण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचं तक्रारदाराचे वकील माजिद मेमन यांनी न्यायालयात सांगितलं. इरफान शेखबाबत आरोपपत्रात दाखल केलेल्या आरोपाबाबत कोणताही गुन्हा केल्याचं समोर येत नाही. त्याबाबत तपास यंत्रणेकडं कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला. त्यामुळे गुन्हाच केला नसेल, तर जामीन मिळणं हा अधिकार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.