महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लहान वयातील प्रसूती आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूला आता आळा बसेल' - मुलींच्या लग्नाविषयी नवीन कायदा

लवकरच मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्यात येणार आहे. या निर्णयाचे मुंबईतील स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्वागत करत आता लहान वयातील प्रसूतीला आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

By

Published : Aug 15, 2020, 10:13 PM IST

Updated : Aug 16, 2020, 1:00 PM IST

मुंबई - स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण आणि समाजात मोठे परिवर्तन होईल, अशी घोषणा केली. ती म्हणजे आता लवकरच मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्यात येणार आहे. या निर्णयाचे मुंबईतील स्त्रीरोग तज्ज्ञांनी स्वागत करत आता लहान वयातील प्रसूतीला आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

डॉ नंदिता पालशेतकर यांची प्रतिक्रिया
भारतात आधी बालविवाह होत होते. अगदी 8-12 वर्षात मुलींची लग्न होत होती. त्यानंतर मात्र कायद्यांने मुलीचे लग्नाचे वय 18 करण्यात आले. हा त्या काळात मुलींसाठी मोठा दिलासा ठरला. पण तरीही भारतात या नियमाचे काटेकोर पालन झाले नाही किंवा आजही होत नाही. आजही 7 लग्नाच्या मागे 1 लग्न हे बालविवाह असतो. कोवळ्या वयात केलेले लग्न मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही महागात पडते. लहान वयात लग्न, परिणामी लहान वयात प्रसूती, प्रसूतीत लहान वयामुळे अनेक शारीरिक समस्या येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण भारतात वाढते आहे. बालविवाहामुळे येणाऱ्या या अडचणी 18 वर्षानंतर लग्न केल्यासही जाणवू लागल्या. 18 वर्षात वा त्या पुढेही काही वर्षे मुली शारीरिकदृष्टया प्रसूतीसाठी तयार नसतात. त्यामुळे 18 वर्षानंतरही लग्न करून मुलींना प्रसूती आणि इतर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातही आता मुली उच्चशिक्षित होत असून त्यांना शिक्षण पूर्ण करेपर्यंत 25 ते 28 वर्षे लागत आहेत. पण अनेक मुलींना पालकांच्या दबावाखाली शिक्षण-करीअर सोडून लग्न करावे लागत आहे. या सर्व बाबी लक्षात घेत मुलीचे लग्नाचे वय 18 वरून वाढवण्याची मागणी होत होती. त्यानुसार आता हे वय 18 वरून 21 करण्यात येणार आहे.

हेही वाचा -'लग्नासाठी २१ वर्षांची अट करण्याआधी मुलींना बारावीपर्यंत शिक्षण अनिवार्य करा' - मंगल खिंवसरा

आयव्हीएफ आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. नंदिता पालशेतकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 18 वर्षे हे लग्नाचे वय वाढवण्याची खरंच गरज होती. कारण 18 वर्षांत मुलीचे शिक्षणही पूर्ण होत नाही वा त्या प्रसूतीसाठी शारीरिक-मानसिकदृष्ट्या तयार नसतात. अनेक मुलींना शिक्षण-कामाच्या अधिकारापासून दूर रहावे लागत आहे. तर 18-20 हे वय मुलीचे खरे तर बालपणच असते. शिकायच्या, बालपणाची अनुभूती घेण्याच्या वयात त्यांना आईपण जगावे लागते, असे म्हणत डॉ. पालशेतकर यांनी लहान वयातील प्रसूतीमुळे होणाऱ्या शारीरिक अडचणी मांडल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मृत्यूमध्ये लहान वयात होणाऱ्या मृत्यूचा आकडा सर्वाधिक आहे. तेव्हा आता लग्नाचे वय वाढवल्यास प्रसूतीचे वय ही वाढेल आणि मृत्यूला आळा बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


लहान वयातील प्रसूतीत मृत्यूचा धोका अधिक आहेच. पण त्याचबरोबर लहान वयातील प्रसूतीमुळे मुलींना अनेक आजार ही जडतात. रक्तदाब, अ‌ॅनिमियासारखे आजार होण्याची भीती अधिक असते. पण आता मात्र या समस्याही दूर होण्याची शक्यता आहे असेही डॉ. पालशेतकर म्हणाल्या.

हेही वाचा -टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Last Updated : Aug 16, 2020, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details