मुंबई:मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांकडून मुंबईत वाहनाची तोडफोड केल्याचा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला. पोलिसांसमोर वाहनाची तोडफोड झाल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. हल्ल्यांची पोलिसांना आधीच माहिती दिली होती. माझ्या मुलीला आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यांचही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोल करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आगडपाखड केली. सदावर्ते म्हणाले, सरकारनं मनोज जरांगे पाटील यांचे लाड थांबवावेत. हल्ला झाला तरी माझा लढा सुरुच राहणार आहे. आरक्षणाच्या आडून जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहे. मनोज जरांगे यांना अटक करा. मला कोणी थांबवू शकत नाही. हीच शांततामय आंदोलनाची व्याख्या आहे. 20 पोलीस असताना घरात घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलन झेपणार म्हणता ते हेच का? या हल्ल्यावर शरद पवार बोलणार आहेत का? माझ्या घरावर हल्ला करण्याचा घाट घातला आहे. धमकीमुळे मुलगी आठ दिवस शाळेत जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. सदावर्ते यांनी तोडफोड प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचं जाहीर केले.