महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या बाजारात गुजराती पांढरा कांदा तेजीत - पांढरा कांदा न्यूज

लाल कांद्याच्या तुलनेने पांढरा कांदा स्वस्त असल्यामुळे त्याची विक्री जास्त होत आहे. परिणामी लाल कांद्याचे भावही कोसळले असल्याची माहिती भायखळा बाजारपेठेचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली.

मुंबईच्या बाजारत गुजराती कांदा तेजीत
मुंबईच्या बाजारत गुजराती कांदा तेजीत

By

Published : Feb 14, 2021, 2:32 PM IST

मुंबई- शहारातील किरकोळ फळ-भाजी बाजारात अवतरलेला पांढरा कांदा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा कांदा गावठी असल्याचे भासवत विक्रेते त्याची जाहिरात करत आहेत. पण प्रत्यक्षात हा गुजरातवरून आलेला कांदा असून हा कांदा स्वस्त असल्याने राज्यातील लाल कांद्याचे भाव कोसळले आहेत, असा दावा विक्रेते करत आहेत.


मुंबई शहरातील बहुतांश किरकोळ बाजारपेठांतील विक्रेत्यांकडे लाल कांद्यासोबत पांढरा कांदा विक्रीस उपलब्ध झाला आहे. घाऊक बाजारपेठेत दोन हजार रुपये क्विंटल या भावाने उपलब्ध होणारा पांढरा कांदा किरकोळ बाजारपेठेत ३० ते ४० रुपयांना विकला जात आहे. त्याच वेळेस लासलगाव, निफाड, जुन्नर, मंचर आदी ठिकाणांहून घाऊक बाजारपेठांत येणारा कांदा किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपयांना उपलब्ध होता. गुजरातच्या भावनगरसह अन्य भागांत पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होते. या कांद्याला निर्यातमूल्य नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री होते.

यंदा या कांद्याचे उत्पादन प्रमाणापेक्षा जास्त झाले आणि तेथील घाऊक विक्रेत्यांनी अन्य राज्यांत माल पाठवण्यास सुरुवात केली तसेच हा कांदा आपल्या कांद्यापेक्षा स्वस्त असल्याने हा कांदा जास्त करून हॉटेल च्या व्यवसायात वापरला जात आहे त्यामुळे याची मागणी देखील वाढली आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (ए.पी.एम.सी.) घाऊक विक्रेते सुरेश शिंदे यांनी दिली.

ग्राहकांना चवीपेक्षा किंमत महत्त्वाची

लाल कांद्याच्या तुलनेने पांढरा कांदा स्वस्त असल्यामुळे त्याची विक्री जास्त होत आहे. परिणामी लाल कांद्याचे भावही कोसळले असल्याची माहिती भायखळा बाजारपेठेचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली. गुजरातच्या कांद्याची आवक सीमावर्ती भागात जास्त असते. मात्र, सध्या मुंबईसह अन्य बाजारपेठांमध्येही पांढऱ्या कांद्याची आवक वाढली आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेला राज्यातील लाल कांदा नवा, वजनाने हलका आणि जास्त काळ न टिकणारा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details