मुंबई -माझगाव येथील जीएसटी भवनला सोमवारी आग लागली होती. आगीनंतर येथील कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. तज्ज्ञांनी इमारतीची तपासणी केल्यावर कामकाजासाठी इमारत सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे. यामुळे आजपासून जीएसटी भवनमधील कामकाज पुन्हा सुरू केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा -पवई आयआयटी मेन गेटसमोर मालवाहू ट्रकला अचानक आग
माझगाव येथे विक्रीकर भवन आहे. काही वर्षांपूर्वी ते 'वॅट भवन' नंतर 'जीएसटी भवन' म्हणून ओळखले जाते. तळचा मजला अधिक इतर नऊ मजले असलेल्या इमारतीच्या छतावर सुशोभिकरणाचे काम सुरू असतानाच सोमवारी दुपारी आग लागली होती. आगीमध्ये ८ ते १० असे तीन मजले जळून खाक झाले. सुरक्षेच्यादृष्टीने या इमारतीत काम करणाऱ्या सुमारे दोन ते सव्वादोन हजार कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. बेस्टचा विद्युत विभाग, अग्निशमन दल, स्ट्रक्चरल ऑडिटर आदी तज्ञ मंडळांनी तपासणी केल्यावर कामकाज करण्यासाठी इमारत योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार आज गुरुवारपासून जीएसटी भवनमधील कामकाज पुन्हा सुरू केले जाणार आहे.