मुंबई Adani Group Project : मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीजनिर्मिती प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू आहेत. या वीजनिर्मिती प्रकल्पामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं हा वीजनिर्मिती प्रकल्प रद्द व्हावा, तसंच आमच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा द्यावा यासाठी उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray) भेट घेतली, असं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. आता राज्यात धारावीनंतर वीजनिर्मिती प्रकल्पाच्या निमित्तानंही अदानींना विरोध होत आहे. यामुळं राज्यात अदानींना विरोध वाढतोय अशी चर्चा सुरू आहे.
अदानींवर लोकांचा विश्वास नाही: धारावीनंतर आता कोल्हापुरातील वीजनिर्मिती प्रकल्पाला देखील विरोध होत आहे. केंद्र सरकार खासकरुन भाजपा हे उद्योगपतींचे हित डोळ्यांसमोर ठेवून प्रकल्प राबवत आहे. मोदी-शाह यांचे अदानींशी चांगले संबंध आहेत. म्हणून राज्यासह देशातील अनेक मोठमोठे प्रकल्प अदानींना मिळत आहेत. परंतु यात केंद्र सरकार गरिबांचा विचार करत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रावर केली. कोल्हापुरातील पाटगाव धरणातील वीजनिर्मिती प्रकल्पामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील, सीमाभागातील तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांना अदानींबाबत अत्यंत वाईट अनुभव आला आहे. अदानींनी व्यवहारामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळं लोकांचा अदानींवर विश्वास नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच हा वीज निर्मिती प्रकल्प रद्द व्हावा, या राजू शेट्टींच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचं देखील खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय.
विरोधकांना अदानींची अॅलर्जी: मागील दीड वर्षामध्ये महायुती सरकारने या राज्यामध्ये अनेक मोठमोठे प्रोजेक्ट मार्गी लावले आहेत. नवीन प्रोजेक्ट हाती घेतले. त्यामुळंच राज्यातील जनतेच्या मनामध्ये या सरकारबद्दल आपुलकीचा भाव निर्माण झाला. जनतेला सरकारची कामं आवडू लागली आहेत. यामुळंच विरोधकांची पोटदुखी सुरू झाली, असं शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलंय. धारावीच्या विकासासाठी मात्र या विरोधकांनी कधीच प्रयत्न केले नव्हते. अदानींना हा प्रोजेक्ट मिळाला या नावाखाली धारावीतील जनतेला चांगली घरे मिळण्याच्या मार्गात विरोधकांनी अडथळे निर्माण केलेत. आता ताजं उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापुरातील पाटगाव धरणातील वीजनिर्मिती प्रकल्पाला सुद्धा विरोधकांनी आपल्याच कार्यकर्त्यांमार्फत विरोध करायला सुरुवात केली. प्रत्येक नवीन प्रोजेक्टला विरोध करणे हाच यांचा धंदा आहे. जर अदानींच्या मार्फत शेतकऱ्यांना वीज मिळणार असेल, आणि त्यांचं भलं होणार असेल तर त्यात गैर काय? पण विरोधक फक्त विरोधाला विरोध म्हणून नवीन प्रकल्पांना विरोध करत आहेत. विरोधकांना अदानींची अॅलर्जी आहे, अशी टीकाही शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते अरुण सांवत यांनी विरोधकांवर केलीय.