मुंबई- बनावट सिमेंट विकणाऱ्या ७ जणांच्या टोळीला शहर पोलिसांच्या मालमत्ता कक्षातील पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई गोरेगाव परिसरातील निर्मल रबर बोर्ड या ठिकाणी छापा मारून करण्यात आली. सदर टोळी नामांकित सिमेंट कंपन्यांच्या सिमेंट गोण्यांमध्ये हलक्या प्रतीचे सिमेंट टाकून विकत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वेगवेगळ्या परिसरांमध्ये अंबुजा सिमेंटच्या नावाखाली हलक्या प्रतीचे सिमेंट विकले जात असल्याची तक्रार अंबुजा सिमेंटच्या अधिकाऱ्यांकडून मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाकडे करण्यात आली होती. पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जात होता. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोरेगाव परिसरामध्ये छापा मारला. यात नामांकित कंपन्यांच्या सिमेंटच्या गोण्यांमध्ये हलक्या प्रतीचे सिमेंट भरताना ७ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.