मुंबई- महानगरक्षेत्रात यंदा नवीन खासगी 35 कनिष्ठ महाविद्यालयांची भर पडली असून त्यामुळे अनुदानित महाविद्यालयांतील रिक्त राहणाऱ्या जागांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी तब्बल 70 हजारापर्यंत जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा 35 महाविद्यालये वाढली असल्याने त्यात मोठी भर पडेल आणि त्याचा फटका हा केवळ अनुदानित महाविद्यालयांना बसेल, अशी भीती शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी मुंबई महानगरक्षेत्रात येणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ नगरपालिका तसेच पनवेल परिसरात 814 कनिष्ठ महाविद्यालये होती. तर एकूण प्रवेशासाठी 3 लाख 17 हजार 60 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 70 हजारांच्या दरम्यान जागा प्रवेशाविना रिकाम्या राहिल्या होत्या. त्याच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राबवलेल्या धोरणामुळे मुंबई महानगरक्षेत्रात 35 नवीन महाविद्यालयांची भर पडली असल्याने, यंदा या जागांमध्ये 5 हजार 200 जागांची वाढ होणार असून याचा सर्वात मोठा फटका हा अनुदानित महाविद्यालयांना बसेल, अशी भीती कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटचे सचिव प्रा. अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.