महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

14,234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान

निवडणुकीचे धुमशान गावा-गावात सुरू आहे. अनेक ठिकाणी चुरशीने लढत होत आहेत, तर काही ग्राम पंचायतींनी त्यांचा बिनविरोध राहण्याचा विक्रम अबाधित ठेवला आहे. काही ग्राम पंचायतींनी तब्बल 50 ते 60 वर्षे बिनविरोध राहण्याचा पराक्रम केला आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Jan 5, 2021, 10:15 PM IST

Updated : Jan 5, 2021, 11:17 PM IST

मुंबई- राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचे धुमशान गावा-गावात सुरू आहे. अनेक ठिकाणी चुरशीने लढत होत आहेत, तर काही ग्राम पंचायतींनी त्यांचा बिनविरोध राहण्याचा विक्रम अबाधित ठेवला आहे. काही ग्राम पंचायतींनी तब्बल 50 ते 60 वर्षे बिनविरोध राहण्याचा पराक्रम केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अशी ग्रामपंचायत जिथे 67 वर्षांपासून निवडणूकच नाही

नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजत असताना दिसत आहेत. त्यामुळे गावागावात सध्या गरमागरम चर्चा सुरू आहेत. मात्र निवडणुकांच्या या सगळ्या रणधुमाळीत सोलापुरातलं एक गाव असं आहे, जिथे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून निवडणूकच लागली नाही. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव टे या गावाने मागील 67 वर्षापासून बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम राखली आहे.

सविस्तर वाचा - विशेष : सोलापूर जिल्ह्यातील अशी ग्रामपंचायत जिथे 67 वर्षांपासून निवडणूकच नाही

30 वर्षे मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध

तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 894 उमेदवारांनी 910 अर्ज दाखल केले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज मरवडे, बोराळेचे दाखल झाले. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत भोसे ग्रामपंचायतीसाठी पाच प्रभागातून 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले. कायमस्वरूपी तालुक्‍यातील कोणत्याही राजकीय नेत्याचे आवाहन न स्वीकारता सलग 30 वर्षे मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परपंरा यावेळी कायम राहिली आहे. नामनिर्देशन पात्रतेची छाननी पूर्ण झाली आहे. यामूळे गाव गाड्यांमध्ये अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. आता अर्ज छाननीत किती उमेदवारांचे अर्ज बाद होतात? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा -मंगळवेढा तालुक्यात भालके, परिचारक अन् अवताडे गटाची कसोटी

65 वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणारं कोल्हापुरातील गाव

कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी तब्बल 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यात एक असे गाव आहे, ज्या गावाने ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजपर्यंत कधीच निवडणुका पाहिल्या नाहीत. मात्र, यावेळी एका व्यक्तीने आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असल्याने गावात एका जागेसाठी निवडणूक लागली आहे.

सविस्तर वाचा - 65 वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

बारामतीतील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीची होणार नाही निवडणूक

बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी माळेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक होणार नाही. याबाबत सत्ताधारी व विरोधकांनी एक मताने शिक्कामोर्तब केले. माळेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी म्हणजे ७७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

सविस्तर वाचा - माळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक

अनगर गावची ग्रामपंचायत होतेय मागील 68 वर्षांपासून बिनविरोध

मोहोळ तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या अनगर ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या 68 वर्षांपासून बिनविरोध होत आहे. अनगर ग्रामपंचायतीची स्थापना 1952 साली झाली असून स्थापनेपासून आजतागायत ग्रामपंचायत बिनविरोध होत आहे. अनगरसह, बिटले, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी, नालबंदवाडी, गलदवाडी, काळेवाडी या ग्रामपंचायतीदेखील बिनविरोध झाल्या आहेत.

सविस्तर वाचा - 68 वर्षांपासून बिनविरोध

श्री. मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

मतमोजणी 18 जानेवारीला

मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

Last Updated : Jan 5, 2021, 11:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details