मुंबई - मध्य रेल्वेच्या ३१ अपघात बचाव ट्रेनमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना अपघाताचे ठिकाण, त्याची संपूर्ण माहिती, संकेतस्थळ मोबाईल अॅप्सच्या मदतीने मिळणार आहे. तसेच या जीपीएस प्रणालीमुळे अपघात झालेल्या ठिकाणांची वाहतूक पुन्हा तत्काळ सुरू होण्यास देखील मदत होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
बचाव ट्रेनमध्ये आता असणार जीपीएस यंत्रणा; अपघात कमी होण्यास होणार मदत - मुंबई
जीपीएस प्रणालीमुळे अपघात झालेल्या ठिकाणांची वाहतूक पुन्हा तत्काळ सुरू होण्यास मदत होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
जीपीएस प्रणालीमुळे रिअल टाइम लोकेशन आणि रिअल टाइम वाहतूक हाताळण्यात मदत होणार आहे. या प्रणालीमुळे १२ ते १८ हजार जीपीएस लोकेशन डेटा रेकॉर्ड करण्यासाठी १६ जीबी इंटरनल मेमरी झालेले बॅटरी बॅकअप बसवण्यात येणार आहे. दहा मीटरच्या पट्यामधील माहिती या जीपीएस प्रणालीमुळे मिळू शकणार आहे. रेल्वे अपघात कमी करण्यासाठी ही जीपीएस प्रणाली लावण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
रेल्वेचा एखादा अपघात झाला, तर त्यामधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेल्वेची एआरटी टीम लवकर या ठिकाणी पोहोचेल यासाठी या जीपीएस प्रणालीची मदत होणार आहे. अपघात झालेल्या ठिकाणी जीपीएस लागल्यामुळे गॅस कटर आणि डॉक्टरांचे पथक लवकरात लवकर अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचेल. तसेच अपघात झालेल्या ठिकाणांची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनाही लवकरात लवकर कळेल. त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना देखील मदत होईल, असे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले.