मुंबई -राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांचा तीन दिवसाचा दौरा जाहीर केला असून या दौऱ्यावर कॅबिनेटमध्ये जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना, 'राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत', असा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यपाल हे उत्तराखंड राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देखील होते. त्यामुळे अजूनही राज्यपालांना मुख्यमंत्री असल्याचे भास होत असल्याचा टोलाही यावेळी नवाब मलिक यांनी राज्यपालांना लगावला.
'सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही' -
राज्यपालांचा तीन दिवसाचा कार्यक्रम जाहीर झाला असून नांदेडमध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने बांधलेले दोन हॉस्टेल आहेत. यासाठी पैसे राज्य सरकारने दिले आहेत. त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून अद्याप ते विद्यापीठाकडे वर्ग केलेले नाही. त्याचे उद्घाटन करुन नंतर विद्यापीठाकडे देणे हा अधिकार राज्यसरकारचा आहे. राज्यपाल व्हीसी असल्याने व्यवस्थापनाचा त्यांचा अधिकार आहे. पण सरकारने केलेली कामे अल्पसंख्याक विभागाला न विचारता, सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही, असेही नवाब मलिक म्हणाले. सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप राज्यपालांवर केला आहे.